टीम लोकमन मंगळवेढा |
राज्य सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या योजनेपोटी दरवर्षी ४६ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे राज्याच्या वित्त विभागाने या योजनेच्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे या योजनेचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.
राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता या योजनेवर होणाऱ्या खर्चाबद्दल वित्त विभागाने मोठी चिंता व्यक्त केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर चर्चा होण्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागाने महिला व बालकल्याण विभागाच्या वर्षभराच्या कार्यक्रमांसाठी आधीच 4,677 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचेही निदर्शनास आणून दिले होते. पण तरीही ‘लाडकी बहीण’ योजनेला मंत्रीमंडळाने मंजुरी दिलीच.
आता या योजनेची अंमलबजावणी करताना राज्याची आर्थिक स्थिती पाहता आवश्यक निधीची व्यवस्था कशी करायची? याची चिंता वित्त विभागाला भेडसावत आहे. आत्तापर्यंत राज्यभरातील 40 लाखांपेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती मिळत आहे.