टीम लोकमन मंगळवेढा |
चालू शैक्षणिक वर्षासाठी २०२४-२५ साठी ज्या वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश देण्याची प्रक्रिया आता नव्याने सुरू होणार आहे.
पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ‘आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी ज्या पालकांनी अर्ज केले आहेत त्यांना सुद्धा आता पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे.
‘आरटीई’ प्रवेशाच्या निकषात बदल करून विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरापासून एक किलोमिटर अंतरावरील महापालिका, जिल्हा परिषद किंवा खासगी अनुदानित शाळा निवडाव्या लागत होत्या. त्यानुसार दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्जही संकेतस्थळावर प्राप्त झाले आहेत. पण, उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरून न्यायालयाने या बदलाला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर मात्र शालेय शिक्षण विभागाला पूर्वीचा बदल मागे घ्यावा लागला. आता पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमिटर अंतरावरील स्वयंअर्थसहाय्यित शाळांची सुद्धा निवड आता करता येणार आहे. इयत्ता पहिलीला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आठवीपर्यंत शासनाकडूनच त्या शाळांना दिले जाणार आहे. १५ जूनपासून शाळा सुरू होण्यापूर्वी अर्ज मागवून पहिली लॉटरी काढण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी पालकांना तातडीने अर्ज करावे लागणार आहेत.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ‘आरटीई’ २५ टक्केअंतर्गत नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दिनांक १७ मे पासून सुरू होणार आहे. त्यावेळी विद्यार्थी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी ‘आरटीई’ २५ टक्क्यांप्रमाणे नोंदणी केली होती किंवा अर्ज केले होते, त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत. यासंदर्भातील आदेश राज्याच्या प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहेत.
‘आरटीई’ प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal हे संकेतस्थळ आहे. पालकांनी १५ दिवसांत या पोर्टलवर अर्ज करणे अपेक्षित आहे.