टीम लोकमन मंगळवेढा |
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासूनच विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असतो. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, दहावी, बारावी बोर्ड परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाबरोबरच योग्य दिशा व अचूक मार्गदर्शन लाभण्यासाठी शिक्षक व पालक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाच्या अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. मिनाक्षी कदम यांनी इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक सत्कार समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
तत्पूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा व अकॅडमीक ॲडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम, डॉ.सुभाष कदम, सहसचिव श्रीधर भोसले, खजिनदार राम नेहरवे, संचालक यतीराज वाकळे, संचालक ॲड. शिवाजी पाटील, इंग्लिश स्कूल वेळापूर स्कूल कमिटीचे चेअरमन पी.एस.पाटील, प्राचार्य रवींद्र काशीद, जयराम आलदर, कल्याण भोसले, आर.व्ही.पवार, मुख्याध्यापक अजित शिंदे, सुभाष बाबर, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने, माजी प्राचार्य सी.व्ही.जाधव, दामाजी एक्सप्रेसचे मुख्य संपादक दिगंबर भगरे, लहू ढगे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत दलितमित्र स्व.कदम गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर पुढे बोलताना डॉ.मिनाक्षी कदम म्हणाल्या की, या प्रशालेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दैनंदिन अभ्यासाबरोबरच वर्षभर विविध धडपडी राबवल्या जातात. विद्यार्थ्यांना विविध विषयातील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळेच या प्रशालेने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तसेच डॉ.सुभाष कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या की, डॉ.सुभाष कदम म्हणजे एक वादळी व्यक्तिमत्व होय. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून आपल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रवास अखंडपणे चालू ठेवला आहे. तसेच स्वतःला संशोधनाला वाहून घेत विविध अनमोल खनिजांचे पेटंट प्राप्त केली आहेत. त्यामुळेच ज्वारीच्या कोठारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या संतभूमीची एक दिवस नवीन ओळख निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे खजिनदार राम नेहरवे तसेच माजी प्राचार्य सी.व्ही. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. तसेच डॉ.सुभाष कदम यांना शुभेच्छा देताना त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनुष्का सुतार, ओम माळी व पालक प्रतिनिधी संतोष वांढरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून कठोर परिश्रम, नियमित सराव व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभल्यामुळे यश मिळाले असे सांगितले.
तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य रवींद्र काशीद यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध धडपडी थोडक्यात सांगून गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील 41 गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच मार्गदर्शक शिक्षक वाल्मीक मासाळ, संध्या राक्षे, विद्या रामगडे, ज्योती पाटील, सतीश सावंत, शिवाजी भोसले, विशाल माने, नर्गिस इनामदार इत्यादींचा ट्रॉफी पेन व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका रेश्मा गुंगे व एस.एस.चटके यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
डॉ.सुभाष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रशालेतील संस्कृतचे शिक्षक मिलिंद कांगे यांनी डॉ.सुभाष कदम यांना तुकाराम महाराजांची सार्थ गाथा हे पुस्तक भेट दिले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत संस्थेच्या विविध शाखेतील मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता या विषयातील तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले.