टीम लोकमन सोलापूर |
सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते संजय क्षीरसागर हे आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षात प्रवेश करणार असल्याने हा भारतीय जनता पार्टीसाठी मोठा धक्का मानला जातो.
संजय क्षीरसागर यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार असून याचा फटका सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना बसणार आहे. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचे बळ वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात किंबहुना सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठे धक्के दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोठे राजकीय घराणे असलेल्या आणि एकेकाळी पूर्ण जिल्ह्यावरती एक हाती सत्ता गाजवलेल्या मोहिते पाटील परिवाराला आपल्या सोबत घेऊन पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला. त्यानंतर माळशिरस तालुक्यातील मातब्बर नेते उत्तमराव जानकर यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने माळशिरस तालुक्यातील भाजप जवळपास संपुष्टात आली. करमाळ्याची माजी आमदार नारायण आबा पाटील यांनीही तुतारी हाती घेतली असून धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराची धुरा ते मोठ्या ताकतीने सांभाळत आहेत. येत्या दोन दिवसात ते शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात शरद पवारांनी पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी मोठा प्रयत्न चालवल्याचे दिसत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा जिल्ह्यातील दबदबा कायम असल्याचे दिसत आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षण व कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार आज जिल्ह्यात येत असून मोहोळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात मोहोळ येथील भाजपचे मातब्बर नेते संजय क्षीरसागर हे शरद पवारांच्या उपस्थितीत आज पवारांच्या राष्ट्रवादीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. यामुळे मोहोळ तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. क्षीरसागर हे राजन पाटलांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. ते गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक म्हणून काम करत आहेत. मोहोळ तालुक्यात भाजप वाढवण्यात संजय क्षीरसागर यांचा मोठा वाटा आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा मोठ्या ताकतीने सांभाळण्याचे काम क्षीरसागर यांनी केले आहे. क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मोहोळ मध्ये भाजप खिळखिळी झाली आहे. याचा परिणाम सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या मताधिक्यावर होणार आहे. क्षीरसागर यांच्या प्रवेशाने मोहोळ तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठे बळ मिळाले असून यामुळे प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य वाढणार आहे. शरद पवार यांनी गेल्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात आपले लक्ष केंद्रित केले असून जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना गळाला लावले आहे. येत्या काही दिवसात आणखी काही मातब्बर नेते पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याची मोठी चर्चा जिल्ह्यात होत आहे.