टीम लोकमन कोल्हापूर |
नाभिक समाजासाठी स्थापन करण्यात आलेले संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रतील सकल नाभिक समाज दि.30 सप्टेंबर 2024 रोजी सोमवारी आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेणार आहे. या आंदोलनासाठी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने नाभिक समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून ते या आंदोलनात सहभाग नोंदवणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील नाभिक समाजाचे नेते अनिल संकपाळ यांनी दिली.
शासनाकडे दिलेल्या निवेदनात केशशिल्पी महामंडळास 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा, उपकंपनीचे मुंबई मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने जाहिरात काढावी व संचालक मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य यांच्या निवडी कराव्यात, थेट कर्ज योजनेतील सिबिल व जामीनदारांची जाचक अट शिथिल करावी, उपकंपनीचे लेटरहेड, कार्यालय, माहितीपत्रक यांचेवर सेना महाराजांचा फोटो वापरावा या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.
13 सप्टेंबर 2019 रोजी स्थापन केलेले केशकला बोर्ड अग्रेषित करून 5 जाने 2024 रोजी ओबीसी महामंडळाची उपकंपनी कऱण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी निधीची तरतूद केलेले आहे. परंतु कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे शासनाने 5 वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची भावना नाभिक समाजाची झाली आहे. म्हणून महाराष्ट्रातील विविध संघटना एकत्र आल्या असून त्या पूर्ण ताकतीने या आंदोलनात सहभागी झाल्या असल्याची माहितीही नाभिक समाजाचे नेते अनिल संकपाळ यांनी दिली.