तांदूळ, साखर, खाद्यतेलापाठोपाठच आता उडीद, मुग, तूरडाळ आणि कडधान्याच्या किमती दगडाला भिडल्याने वरण भातावर ताव मारणाऱ्यांना आता हात आकडता घ्यावा लागणार आहे.
कडधान्यांच्या उसळी करताना गृहिणींना कसरत करावी लागणार आहे. होलसेल मार्केटमध्ये तूरडाळ 165 रुपये किलो तर रिटेल मार्केटमध्ये 180 ते 185 रुपये किलो साठी मोजावे लागत आहेत. येत्या काही दिवसात तूर डाळीचे दर 30 ते 40 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे यामुळे तूर डाळीचा दर प्रति किलो 220 रुपयांवर जाऊ शकतो. यामुळे महिलांच्या किचनचे आर्थिक बजेट कोलमडू शकते.
निसर्गातील बदलामुळे गेल्या दोन वर्षांपासून तुरीला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यामुळे तूरडाळीच्या भावाचा आलेख सतत चढताना दिसत आहे. याचा मध्यमवर्गीयांच्या खिशावर चांगलाच परिणाम झाला आहे. अवकाळी पावसामुळे तुरीचे उत्पादन घटल्याने तूरडाळीच्या दरात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तूरडाळीच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे.