टीम लोकमन मंगळवेढा |
मोबाईल वापरकर्त्यानो सावधान…जर तुम्हीही मोबाईलचा वापर करत असाल तर सावधान. मोबाईलचा स्फोट होऊन एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियातील सिरेगाव टोला येथे घडली आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दुचाकीवरुन जाताना मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरेगाव/टोला येथे घडली आहे.
मोबाईलच्या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुरेश संग्रामे असे आहे तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नत्थु गायकवाड आहे. हे दोघेही मित्र असून ते दुचाकीवरुन जात होते. खिश्यात मोबाइलाचा स्फोट झाला. स्फोट होऊन कपड्याला आग लागली यात संग्रामे यांचे शरीर भाजल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
तर दुचाकीवर त्यांच्या मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेले सुरेश संग्रामे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.
सध्याच्या काळात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच स्मार्टफोनमधील मेसेज पाहण्यापासून होते. तर रात्री बेडवर झोपल्यावर सुद्धा फोन हातातच असतो. याच स्मार्टफोनच्या माध्यमातून केवळ फोन कॉल्स नाही तर मेसेज, व्हिडिओ पाठवणे, व्हिडिओ शूट करणे, फोटो क्लिक करणे इतकेच नाही तर आर्थिक व्यवहार सुद्धा करता येतात. त्यामुळेच स्मार्टफोन हा मनुष्याच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. पण हा स्मार्टफोन वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा जीवावर बेतू शकते.
अशीच एक घटना भंडाऱ्यात घडली आहे. सुरेश संग्रामे (वय 55) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर नत्थु गायकवाड (वय 56) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मयत सुरेश आणि नत्थु हे गुरुवारी संध्याकाळी नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी जात असताना सुरेश यांच्या खिशात असलेल्या फोनचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत सुरेश यांचा मृत्यू झाला तर नत्थु हे गंभीर जखमी झाले असून नत्थु यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कशामुळे होतो स्मार्टफोनचा स्फोट?
फोनचा स्फोट होण्याची मुख्य कारण बॅटरी असली तरी बॅटरीमध्ये अनेकदा बिघाड होत असतो. लिथियम-आयन बॅटरी, जी बऱ्याचदा मोबाइल फोनमध्ये वापरली जाते. एक सकारात्मक टर्मिनल, एक नकारात्मक टर्मिनल (कॅथोड आणि ॲनोड) आणि एक इलेक्ट्रोलाइट असते. बॅटरीममध्ये काही खराबी आल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. ज्यामुळे आयन थेट कॅथोड आणि ॲनोडदरम्यान जाते. त्यामुळे बॅटरीच्या आतील तापमान आणि दाब वाढतो. ज्यामुळे स्फोट होऊ शकतो.