टीम लोकमन मंगळवेढा |
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी ७ मे रोजी मतदान होत आहे. यासाठी मरवडे नगरी सज्ज झाली असून या उत्सवाची ग्रामपंचायतच्या वतीने जोरदार तयारी चालू आहे. एखाद्या लग्न घरात जशी लगबग सुरू असते अगदी तशीच लगबग मरवडे येथील मतदान केंद्रावर सुरू आहे. मतदान केंद्रावर विविध उपाययोजना केल्या जात असून मतदारांना जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून मरवडे येथील मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे मरवडे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका राखी जाधव यांनी सांगितले.
मरवडे गावातील मतदारांना यावेळी मतदान केंद्रावर सुखद अनुभव मिळणार आहे. मतदान केंद्रावर मतदारांना मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येत असून यासाठी शासकीय यंत्रणेसह मरवडे ग्रामपंचायतची टीमही मोठ्या उत्साहाने कार्यरत झाली आहे. मरवडे येथील मतदान केंद्रावर सावलीसाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मतदारांना मतदानासाठी रांगेत उभे असताना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडपाची व्यवस्था केली असून मतदारांना उखाड्याचा त्रास होऊ नये यासाठी रांगेत कुलर व पंख्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रांगेतील मतदारांसाठी मॅटची व्यवस्थाही केली आहे. मतदान केंद्राबाहेर आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून रंगीबेरंगी फुग्यांनी मतदान केंद्र सजले आहे.
मतदान केंद्रावर मतदारांसाठी थंड पाण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे. मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ मदतीसाठी मतदान केंद्रावर चार बीएलओ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. मतदार मातांच्या नवजात शिशुला स्तनपान करता यावे यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. महिला मतदारांच्या लहान बालकांसाठी पाळणाघराची व्यवस्था ही करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर स्वतंत्र आरोग्य कक्षही उभारला आहे. या कक्षात प्रथमोपचारासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी सज्ज आहेत. या निवडणूक प्रक्रियेतील कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेतील कर्मचारी यांना विश्रांतीसाठी विश्रांती कक्षही उभारण्यात आला आहे. अंध मतदारांना सहाय्य करण्यासाठीही कर्मचारी आहेत. अपंग व दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर आणि रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर गुलाब पुष्प देऊन मतदारांचे स्वागत केले जाणार असून मतदान करून आल्यानंतर थंडगार मठ्ठा पिण्यासाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय आणखी बऱ्याच सोयी सुविधा मतदारांसाठी मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत.
मंगळवेढा तालुक्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात मरवडे गावातून झाली आहे. तालुक्यात बौद्धिक व्याख्यानमालेची सुरुवात असेल किंवा फेस्टिवल असेल याची सुरुवात मरवडे गावातूनच झाली आहे. आता हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव भव्य दिव्य करण्याची सुरुवात देखील मरवडे गावातूनच होत आहे. या सर्व सोयीसुविधांमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून याचा परिणाम मतदानाचा टक्का वाढण्यावर होणार आहे. मतदान केंद्रावरील या सुविधांचा देखील मरवडे पॅटर्न संपूर्ण राज्यभर जाईल यात शंका नाही.
मरवडे येथील मतदान केंद्रावरील हि शाही व्यवस्था म्हणजे मतदारांना सुखद धक्का असून यासाठी पुढाकार घेणाऱ्या मरवडे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका राखी जाधव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हे प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहेत. त्यांच्या या अविरत प्रयत्नामुळे मरवडेतील मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र निश्चितपणे होईल असा आशावाद आहे.
मंगळवेढा पंचायत समितीचे कार्यतत्पर गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या संकल्पनेतून आणि सूचनेनुसार आम्ही मतदारांना मतदान केंद्रावर जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. चांगल्या कार्यासाठी गटविकास अधिकारी साहेबांचे नेहमीच मार्गदर्शन, पाठबळ आणि प्रोत्साहन मिळते. त्यांच्या पाठबळामुळे काम करताना उत्साह येतो आणि नवनवीन गोष्टी करता येतात. लोकहिताच्या नवनवीन संकल्पना राबवत असताना योगेश कदम साहेबांचे प्रोत्साहन मिळते त्यामुळे ते कार्य अधिक जोमाने आणि उत्साहाने करता येते त्यामुळे अनेक नवनवीन संकल्प पूर्ण करता येतात असे ग्रामसेविका राखी जाधव यांनी सांगितले.
मरवडे येथील मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र करण्यासाठी आणि मतदारांना जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे, प्रांताधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार मदन जाधव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे, मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार मंडल अधिकारी सौ. बी. एल. घुगे, तलाठी हरीश मच्छिंद्र काटकर, ग्रामसेविका सौ. राखी सुनील जाधव, बीएलओ राजेंद्र बाबुराव कोरे, नंदकुमार सुखदेव जाधव, गणेश भागवत, रावसाहेब आबासाहेब जाधव, पोलीस पाटील महेश रंगनाथ पवार, तलाठी कार्यालयातील कर्मचारी उमेश हरी काळे, कोतवाल विजय महादेव पवार, ग्रामपंचायत कर्मचारी नवनाथ भानुदास बनसोडे, उमाकांत महादेव लवटे, पांडुरंग कृष्णा मोरे, संजय सुखदेव जाधव, आशा वर्कर निर्मला पडवळे, मेघा गायकवाड, सुवर्णा मस्के, सारिका पवार, अंगणवाडी सेविका कमल रामचंद्र रोंगे, अनिता सुरेश बनसोडे, उज्वला मधुकर पोतदार, भाग्यश्री वैजनाथ पारखे, मदतनीस उज्वला राजाराम गुंड, सुवर्णा विक्रम पवार, सुनिता दीपक जाधव, सविता सिद्राम कोरे हे सर्व प्रयत्न करीत आहेत.