टीम लोकमन मंगळवेढा |
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरु होती. दोन दिवसांपूर्वी अजित पवार पुणे जिल्ह्यातील शिरुरमधून निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या.
परंतु यातील सस्पेंस आता संपला आहे. अखेर अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढणार असल्याचे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सलग सातवेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपण बारामतीतून लढवणार नसल्याचे संकेत दिले होते. आता बारामतीतून लढण्याची इच्छा नाही असे अजित पवार यांनी स्वत:च जाहीर केले होते. दरम्यान दोनच दिवसापूर्वी अजित पवार शिरुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
त्यामुळे अजित पवार नेमके कोणत्या मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढणार याची उत्सुकता राज्यातील राजकीय वर्तुळाला लागली होती. अखेर माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याचे जाहीर केले. आमच्या पक्षाची पहिली उमेदवारी मी जाहीर करत असल्याचेही पटेल म्हणाले.