टीम लोकमन मंगळवेढा |
‘आपला आमदार आपल्या गावी मुक्कामी’ या उपक्रमांतर्गत गेल्या दोन दिवसात सलगर बुद्रुक येथील माता भगिनी, वडीलधारी मंडळी अन ग्रामस्थांनी भरभरून प्रेम दिले. या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे अशी भावना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली.
आमदार समाधान आवताडे यांनी ‘आपला आमदार आपल्या गावी मुक्कामी’ या उपक्रमांतर्गत मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे मुक्काम करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना केल्या. ‘आमदार आपल्या गावात मुक्कामी’ आल्याचे पाहून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व औत्सुक्याचे वातावरण पहायला मिळाले.
रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी आमदार समाधान अवताडे हे दोन दिवसाच्या गाव दौऱ्यासाठी सलगर बुद्रुक येथे दाखल झाले. गावात येताच गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. सध्या गावांमध्ये गणरायाचे आगमन झाले असल्याने गावात गणेश भक्तीचे वातावरण आहे. हे लक्षात घेऊन आमदार अवताडे यांनी गावातील वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी दिल्या व गणरायाची आरती सुद्धा केली. त्यानंतर गावातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, महिला बचत गट, दूध अनुदान प्रश्न इत्यादी प्रश्नावर त्यांनी गावकऱ्यांची बाजू ऐकून घेतली. प्रत्यक्षात त्या त्या ठिकाणी जाऊन सदरच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पाण्यासाठी महिलांचा आक्रोश – गावात एन पावसाळ्यातही गेल्या महिनाभरापासून गावात पिण्यासाठी पाणी मिळत नाही म्हणून गावातील महिलांनी आमदारांकडे तक्रार केली असता, आमदारांनी याबाबत ग्रामविकास अधिकारी यांना सूचना देऊन दोन ते तीन दिवसात गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध द्या. अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दमही दिला.
तसेच आवताडे यांनी म्हैसाळ योजनेअंतर्गत या भागातील सर्व बंधारे भरून घ्यावेत अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देत ओव्हरलोड डी.पी.चा भार कमी करण्यासाठी आर डी एस एस अंतर्गत नवीन डीपी साठी प्रस्ताव सादर करावेत जेणेकरून नवीन डीपी मंजूर करून शेतकऱ्यांचा वीजप्रश्न सोडवता येईल.
आमदारांनी दिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना डोस
सदर दौऱ्यादरम्यान आवताडे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलाच डोस दिला. रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी येथील आरोग्य विभागाला आदेशीत करण्याच्या सूचना द्याव्यात असे जिल्हा आरोग्य विभागाला कळवले आहे. या दौऱ्यात आवताडे यांच्या समवेत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, सभापती सुधाकर मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
याठिकाणी दिल्या भेटी– आमदार आवताडे यांनी शिंदे वस्ती, बनसोडे वस्ती, चौधरी वस्ती, पुकळे वस्ती, बौद्ध नगर, संगोलकर वस्ती, टिक्के वस्ती, जिल्हा परिषद केंद्र शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, धायगोंडे वस्ती, दूध संकलन केंद्र, आदी ठिकाणी भेटी देऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. शिवाय नागरिकांनी उपस्थित केलेले विविध प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचनाही अवताडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
सलगर गावासाठी आमदारांनी दिला 20 कोटींचा निधी
गेल्या तीन वर्षांत आमदार आवताडे यांनी आमदार फंडातून सुमारे 20 कोटींचा निधी सलगर बुद्रुकला दिला असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. यात नवीन अंगणवाडी बांधकाम, मंदिरांना सभामंडप, गावातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य उपकेंद्र आदी कामांसाठी गेल्या तीन वर्षात 20 कोटी रुपयांचा निधी सलगर बुद्रुक गावाला मिळाला असल्याची माहिती आमदार आवताडे यांनी दिली.
चिमुकल्यांशी संवाद साधत केली दौऱ्याची सांगता
दोन दिवसांच्या दौऱ्याचा शेवटचा कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्र शाळा सलगर बुद्रुक येथे घेतला गेला. यात आमदार आवताडे यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवाय शाळेतील समस्या जाणून घेऊन त्यावर उपायोजना करण्याच्या वरिष्ठांना सूचना केल्या.