न्यूज लोकमन मंगळवेढा |
सोलापूर लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात भोसे, नंदेश्वर, लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी, सजावट, मतदारांचे स्वागत करणे, मतदान खोलीपर्यंत मतदारांना पोहचविणे आदी कामांमध्ये मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थ्यांनी लोकशाही उत्सवाच्या कामांमध्ये पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यामध्ये युवकांनी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले.
सोलापूर लोकसभा निवडणूकीसाठी मंगळवेढा तालुक्यात भोसे, नंदेश्वर, लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रावर मतदारांना आपले मतदान कोणत्या खोलीमध्ये सुरू आहे हे समजण्यामध्ये अडचण व गोंधळ होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली होती. या मतदान केंद्रावर दिशादर्शक फलक तयार केले होते आणि मतदारांना प्रत्यक्ष मतदान खोलीपर्यंत पोहचविण्यासाठी मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांना स्वयंसेवक म्हणून मदतीला घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.आणि या कामामध्येही विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले.
या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी निळा, हिरवा, पांढरा, गुलाबी अशा रंगाचे टीशर्ट घातले होते. या केंद्रावरील मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी, सजावट, मतदारांचे स्वागत करणे या कामामध्ये चांगली मदत केली. सदर कामांमध्ये मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लोकशाही उत्सवाच्या कामामध्ये पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यामध्ये भावी पिढी असणाऱ्या युवक व युवतींनी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले. विशेषतः मतदान केंद्रावरील वयस्कर, अपंग, निरक्षर, रुग्ण आदी मतदारांना त्यांची मतदार स्लिप बघून केंद्रातील खोलीकडे पोहच करण्याच्या व्यवस्थेसाठी चांगली मदत झाली.
यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव ,नायब तहसीलदार (निवडणूक) जयश्री स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी डी.एस.इंगोले , पुरवठा अधिकारी हणमंत पाटील, तलाठी दिनेश सोनवणे, अनुजा मलगोंडे, प्रणाली कुरणे, मंडल अधिकारी श्यामबाला कुंभार, कोतवाल जरग यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न केले तसेच मतदान केंद्रावर मतदारांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला.
मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर जास्त बुथ असल्यामुळे आपले मतदान कोणत्या खोलीमध्ये आहे हे समजत नव्हते पण विद्यार्थी स्वयंसेवक मदतीला आल्यामुळे मला मतदान अगदी वेळेत करता आले.
विश्वास माने, मतदार